"भग्न स्वप्नाच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही! मानवाचे मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडांनी

करकचून बांधून ठेवता येत नाही! त्याला भविष्याच्या गरूडपंखांचं वरदानही लाभलेलं आहे. एखाद स्वप्न पहाणं, ते फुलविणं आणि दुर्दैवानं ते स्वप्न जरी भंग पावलं तरी त्याच्या तुकड्यांवरून रक्ताळलेल्या पायांनी दुस-या स्वप्नामागनं धावणं, हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो तो यामुळं! 

अमृतवेल - वि.स.खांडेकर

आध्द युगातील ऋषीनां स्फूर्ती झाली. परमेश्वराचे स्वरूप पाहण्याचा त्यांच्या प्रतिभेने प्रयत्न केला. वेद जन्माला आले. मात्र परमेश्वराविषयी 'नेति नेति' एवढेच ज्ञान त्यांना झाले ! जनता विस्मयाने म्हणाली, 'खरे तत्वज्ञान ते हे' ! मध्य युगातल्या सज्जनांना स्फूर्ती झाली. परमेश्वराचे स्वरूप पाहण्याची प्रतिज्ञाच केली त्यांनी मग काय !

दगड देव बनला, वानर ईश्वर झाला. परमेश्वर जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी आहे ; असे ज्ञान त्यांना झाले. जनता आनंदाने उद्गारली, 'खरी भक्ती ती ही, !

विज्ञान युगातल्या शास्त्रज्ञांना स्फूर्ती झाली. दगडापासून वानारापर्यंत सर्वांच्या जीवनावर आपल्या शोधांचा प्रकाश त्यांनी पाडला ; पण त्यात परमेश्वर कुठेच दिसेना .ते तुच्छतेने म्हणाले, 'नेति नेति' 'जनता क्रोधाने किंचाळली' "नास्तिक नास्तिक !"

युगांतर - वि.स.खांडेकर