या सर्व सहकार्यांना हेमालाकशाच्या प्रकल्पावर घराच्या सारखं वाटेल याची काळजी मंदाने घेतली.  

असेल त्या परिस्थितीत तिने आला दिवस साजरा केला.  मला आठवतं, एकदा दिवाळीत आमच्याकडे डालडा नव्हता.  मग तिने जवसाच तेल वापरून लाडू केले.   त्याला थोडा उग्र वास येत होता; पण त्याला इलाज नव्हता.  तेव्हढ्यात बाबा भेटायला आल्याचा निरोप घेऊन जगन आला.  त्यांना भेटायला आम्ही इकडून हि मिठाई घेऊन गेलो.  त्यांना ते लाडू बघून खूप वाईट वाटलं. पण मंदाची गोष्टच निराळी.  तक्रार करत बसण्यापेक्षा आहे त्यात जमवायचं, हे पथ्य मंदाने पाळलं.  इथे येऊन गेलेले काहीजण आम्हाला वानावासाताल्या राम-सीतेची उपमा द्यायचे. पण मी तर म्हणतो, की सीतेला सोनेरी हरणाच्या कातड्याचा तरी मोह झाला होता.  मंदाला मात्र कसलाच मोह कधीही झाला नाही.  अबोलपणे, पण भक्कम रीतीने ती सतत माझ्याबरोबर राहिली. 

"आदिवासींना मुख्य प्रवाहात आणावं. त्यांची पिळवणूक थांबावी आणि त्यांना माणूस म्हणून जगण्याची संधी मिळवून द्यावी, असं बाबांच्या मनात होत.  या कामाची जबाब दारी मी घेतली आणि सर्वांनी मिळून ती पार पाडली.  बाबांनी दाखवलेला विश्वास, ताईची माया नि मंदाची भक्कम साथ यामुळेच हे काम इथवर येऊन पोहोचलं."   

प्रकाश वाटा :  डॉक्टर प्रकाश आमटे