प्रिय..... प्रेमाचे दोन अश्रू.
मी तुला सदर पत्र लिहीत आहे याच आश्चर्य वाटत असेल 

कदाचीत! नाही?

पण खरोखरच तुझ्या स्मृती आज वेदनेची ओल घेऊन हृदयात कुठेतरी रूजून बसली आहे . वेदना दाखवायची इच्छा मुळीच नसते. आलीच दाखवता तर वेदना देणा-यासच दाखवावी असं वाटतं . परंतु क्षणार्घातच दुसरा सुध्दा एक विचार तरळून जतो, वेदना देणा-यासच वेदना दाखवुन उपयोग काय ? खरं तर त्या वेदनांची उजळणीच तेवढी होईल. एवढच ना? तरीपण त्याचाच हव्यास आहे. त्याकरीताच असा हा क्षण घेऊन यावा वेदनेच्या पोटातील त्या क्षणाच्या सुखाकरिता आसूसलेलं माझं मन कधीपासून गटांगळ्या खात फ़िरत आहे. कित्येक क्षण येतात व जातात . अशीच क्षणं येत राहिलीत . एकदाच तो क्षण यावा आणि कायमचा सोक्षमोक्ष व्हावा असं वाटायच. तु झुकलीस पण पुरेपुर झुकली नाहीस. काव्याला अनुभवाची शेकोटी तेवढी आपण शेकत राहीलोत. रस्त्याने जातानाच्या नजरा नजरेत धुंद आपण नक्कीच झालो. पण तीच जखम ओल धरून नियतीचा क्रूर आघात ठरेल असं वाटल नव्हतं. आता नियतिचा निषेध तो काय करायचा?
सुख आणि अपयशाची वजाबाकी मनात एक धास्ती निर्माण जाते. हुंकारासाठी माझ मन हपापत राहिलं,पण वेळ कायमची टळून गेलीही. वाटलं तरी सुद्धा परत येणं कठीण होतं. वा-याच्या विरूध्द दिशेवर तु मला सोडून गेलीस. "अशात मला सोडून जाऊ नकोस गं " माझे शब्द ओठातच विरून गेलेत. हा प्रसंग कधीतरी घड्णार असं नियतीनं केव्हाच दर्शविलं होतं . मनाची समजूत घालत घालत पुढे जायच ठरवत होतो मी. परंतु पुढे जाणं पाहिजे तेवढं सोपं नव्हतं . मनाची दोलायमान अवस्था मनाचा पाठलाग करित होती. कोंडलं मन काहीच निर्णय घेऊ शकत नव्हतं . जगण्याचा मोहात जगण्याचा अर्थच विसरत चाललो होतो.
सुखाचे चार दिवस ख-या अर्थाने सुखाचे राहीले नाहीत. फ़क्त त्याला सुखाचा गंध होता, बाकी होतं सारं बेचव रिकामं मन घिरट्या घालीत होतं दृष्टिकडेच. प्रणयाचा बहर तर गेला उधळून केव्हाचाच . हा निर्माल्याचा सडा होता. निष्फ़्ळ प्रयत्न करित होतो. थोट्या हातांनी यांना गोळा करण्याचा ,फ़ाटक्या ओंजळीत साठवून घेण्याचा  प्रयत्न करित होतो जितकी गवसतील तितकी फ़ुलं. हा माझा व्यर्थ खटाटोप ! कारण नियतीचं देणं होतं प्रारब्धाला कुणास ठाऊक ? माझा सुध्दा दोष असेल. माझं सुध्दा हृदय झुकलं पण पुरेसं झुकलं नसेल आणि अपु-या झुकल्या हृदयानी मला सावरताच आलं नाही.
फ़क्त वाट बघत राहिलोत आपण एकमेकांची . कळेनासं झाल्यावर ,हृदयाची जवळ येण्याची ओढ, भावनांचा अंदाज घेण्याची साथ सुटून गेल्यावर ; उभारलेलं आयुष्य , मखमली गोंड्स स्वप्नाचे पंख कुसकरल्यावर पडलं अंगणात एक कोमेजलेलं फ़ुल ! परंतु तो पर्यंत मीच पुढे निघुन गेलो ,परत न येण्याच्या शक्यतेपर्यंत . कारन तोच तोचपणा कितीदा राखायचा ,कितीदा ठरवायचं आणि फ़ुल तर पडलयं. परंतु कुठे आहे ती भरारी? कुठे आहे तो उल्लास? उत्तर ठाऊक असतं. पण शुन्यात हरवलेलं माझं मन टाळत असत त्या शुन्यतेला. कदाचित भिती वाटत असेल त्याला सामोरे जाण्याची.
का? का? का? निर्माल्य झालं तुझ्या भावनांच ! कां निर्माल्य झालंय तुझ्या भावनांच ? जिवनाचं ? अव्हेरला नव्हता कधी मी तुझा स्पर्श ! अव्हेरला नव्हतं मी कधीच तुझं आपलेपण ! मग कां तोंडघशी पाडलंय ह्या घटनांनी, नियतीनी! कां तो क्षण घडून आला नाही ? जेणेकरून मी सावरू शकलो असतो तुला व तु सावरू शकली असतीस मला . परंतु असं घडणार नव्हत. शेवटी घडायचं तेच घडलं . वा-याच्या विरूध्द दिशेवर सोडून गेली नियती अन गंटागळ्या खात राहिलोत पडून आपण ह्या भावना कल्लोळात . रण माजलयं सभोवताल अयशस्वी चुकांच आणि मी अड्कुन पड्लोय आपल्याच प्राक्तनात!

--- अशोक लंगडे